अरूण जेटली साप असून त्यांना खोटे बोलण्याची सवयच- ललित मोदी

256

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – देश सोडण्यापूर्वी मी अरूण जेटलींना भेटलो होतो  असे विजय मल्ल्याने म्हटले आहे. ज्यावरून काँग्रेस भाजपात आरोप प्रत्यारोप होत आहेत. या सगळ्या वादात आता भारतातून फरार झालेल्या ललित मोदींनी उडी घेतली आहे. आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी अरूण जेटली यांची तुलना सापाशी केली आहे आणि त्यांना खोटे बोलण्याची सवयच असल्याचे म्हटले आहे. विजय मल्ल्या जे म्हटला आहे की देश सोडण्यापूर्वी त्याने अरूण जेटलींची भेट घेतली ते खरे आहे.

विजय मल्ल्या अरूण जेटलींना भेटला होता हे तिथे असलेल्यांना माहित आहे. तरीही जेटलींनी मल्ल्यांची भेट घेतल्याचे वृत्त का फेटाळले जाते आहे? असा प्रश्न ललित मोदींनी उपस्थित केला आहे. तुम्ही एका सापाकडून (सापाचे चिन्ह) आणखी काय अपेक्षा ठेवणार? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. एवढेच नाही तर ललित मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये विजय मल्ल्यासोबत अरूण जेटलींनाही टॅग केले आहे.

कर्जबुडव्या विजय मल्ल्याने बुधवारी वेस्टमिन्स्टर कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान भारत सोडण्यापूर्वी अरूण जेटलींना भेटलो होतो अशी प्रतिक्रिया दिली. ज्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जेटलींना विजय मल्ल्या देश सोडून पळणार हे आधीच माहित होते असा आरोप केला आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. मात्र विजय मल्ल्या खोटे बोलत असून त्याने जे म्हटले आहे ते बिनबुडाचे आहे असे अरूण जेटलींनी म्हटले आहे. आता ललित मोदी यांनी अरूण जेटलींची तुलना सापासोबत करत त्यांना खोटे बोलण्याची सवयच असल्याचे म्हटले आहे.