अरुण गवळीच्या ‘त्या’ अत्यंत जवळच्या व्यक्तीला पिस्टल बाळगल्याप्रकरणी अटक

1

चिखली, दि. १० (पीसीबी) – अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या खेड तालुकाध्यक्षाला आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई चिखली प्राधिकरण येथे करण्यात आली.

दत्तात्रय किसन गाडे (वय 35, रा. येलवाडी, ता. खेड), रणजित बापू चव्हाण (वय 26, रा. वेताळनगर, मोरया हाऊसिंग सोसायटी, चाफेकर चौक, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक संदीप पाटील, पोलीस शिपाई शैलेश मगर यांना माहिती मिळाली की, स्पाईन रोड, चिखली प्राधिकरण येथे जाधव सरकार चौकात रेकॉर्डवरील गुन्हेगार रणजित चव्हाण त्याच्या मित्रांसोबत येणार आहे. त्याच्याकडे पिस्टल सारखे हत्यार आहे.

त्यानुसार पोलिसांनी जाधव सरकार चौकात सापळा लावला. आरोपी रणजित चव्हाण आणि त्याचा मित्र आरोपी दत्तात्रय हे दोघेजण पायी चालत येऊन रस्त्याच्या बाजूला कुणाचीतरी वाट पाहत थांबले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि झडती घेतली. दोघांच्याकडे दोन देशी बनावटीची पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे असा एकूण 80 हजार 800 रुपयांची हत्यारे आढळून आली. पोलिसांनी हत्यारे जप्त करून दोघांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

आरोपी दत्तात्रय गाडे हा अखिल भारतीय सेना या पक्षाचा खेड तालुकाध्यक्ष आहे. तर आरोपी रणजित चव्हाण हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात 12, निगडी पोलीस ठाण्यात दोन, वाकड पोलीस ठाण्यात दोन आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा तयारी, शरीराविरुद्धचे एकूण 17 गुन्हे आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, शाकीर जिनेडी, पोलीस अंमलदार अशोक दुधवणे, गणेश हजारे, सुनील कानगुडे, संदीप पाटील, शकुर तांबोळी, किरण काटकर, शैलेश मगर, निशांत काळे, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, सुधीर डोळस, अशोक गारगोटे यांनी केली.

WhatsAppShare