अयोध्या निकाल: भूतकाळात घडलेले विसरून पुन्हा एकत्र येऊ – भागवत

184

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – बहुप्रतिक्षित असलेल्या राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने अखेर निकाल दिला. वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देऊन, मशिदीसाठी अयोध्येत पाच एकर जागा दिली जाईल, असे घटनापीठाने सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वागत केले आहे. “न्याय देणाऱ्या निर्णयाचे स्वागत. या दीर्घकालीन प्रक्रियेत बलिदान दिलेल्याचे स्मरण करतो. भूतकाळात घडलेले विसरून पुन्हा एकत्र येऊ,” असे भागवत म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने सकाळी अकरा वाजता अयोध्येतील वादग्रस्त जागेवर निकाल दिला. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना निर्णयाचे स्वागत केले. मोहन भागवत म्हणाले, ” न्याय देणाऱ्या निर्णयाचे स्वागत. राम मंदिरासाठी ही प्रक्रिया दीर्घकाळ चालली. यासाठी बलिदान दिलेल्याचे आम्ही स्मरण करतो. त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवणाऱ्या सर्वांचे आभार. देशवासियांनी या निकालाकडे जय-पराजय म्हणून बघू नये. संविधानाला अनुसरूण संयमाने आनंद साजरा करावा,” असे आवाहन त्यांनी केले.

पुढे बोलताना भागवत म्हणाले,”मशिदीसाठी कुठे जागा द्यायची ही सरकारची जबाबदारी आहे. न्यायालयाने सर्व निर्णय दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर सरकारकडून लवकर कार्यवाही होईल अशी अपेक्षा. भूतकाळ विसरून पुन्हा एकत्र येऊ, असे आवाहन भागवत यांनी केले.

 

WhatsAppShare