अयोध्या निकाल: अशोक सिंघल यांना तात्काळ भारतरत्न जाहीर करावे- सुब्रमण्यम स्वामी

213

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं एकमतानं म्हणजेच, ५-० ने हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालानंतर भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या विजयाच्या क्षणाला अशोक सिंघल यांचे स्मरण करूया. नरेंद्र मोदी सरकारने त्यांना तातडीने भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करावी,’ असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वाद आता संपुष्टात आला असून वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे आता वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते. या निकालानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनीही या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आताच्या विजयाच्या क्षणी अशोक सिंघल यांचे स्मरण करायला हवे आणि नरेंद्र मोदी सरकारने त्यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर करायला हवा, ‘ अशी मागणी त्यांनी केली.

अयोध्या खटल्याच्या निकालानंतर भाजप नेत्या उमा भारती यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.’ सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे मनपूर्वक स्वागत करते. अशोक सिंघल यांचे स्मरण करून त्यांना नमन करते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी आपलं सर्वस्व पणाला लावले, त्या अडवाणींचे अभिनंदन करते.’ असे ट्विट उमा भारती यांनी केले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही ट्विट करून या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘सुप्रीम कोर्टाद्वारे दिलेला हा ऐतिहासिक निकाल एक मैलाचा दगड ठरेल असा विश्वास आहे. या निर्णयामुळे भारताची एकता, अखंडता आणि महान संस्कृतीला आणखी बळ मिळेल, ‘ असे अमित शहा म्हणाले. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या वादावर आलेल्या या निकालामुळे अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे. भारताची न्यायव्यवस्था आणि सर्व न्यायमूर्तींचे अभिनंदन करतो, असेही ट्विट त्यांनी केले.

WhatsAppShare