अमोल कोल्हेंकडे मुंबई राष्ट्रवादीचे नेतृत्व देण्याची मागणी

125

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत ‘जायंट किलर’ ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे नवनिर्वाचित खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे राजकीय वजन प्रचंड वाढले आहे. फर्डे वक्ते आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या कोल्हे यांच्याकडे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सोपवावी, अशी मागणी पुढे आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एका गटाने थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच तसे साकडे घातले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक गुरुवारी पार पडली. पक्षाच्या मुंबईतील स्थितीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी अमोल कोल्हे यांना मुंबईची जबाबदारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. सध्या मुंबईची धुरा माजी मंत्री सचिन अहिर यांच्याकडे आहे.

छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांमुळे अमोल कोल्हे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले आहेत. तरुणाईमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत. कोल्हे हे उत्तम संघटक आहेत. एखादी भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दिग्गज उमेदवार शिवाजीराव-आढळराव पाटील यांना टक्कर देताना त्यांनी हे सिद्ध केले. त्यांच्या या कौशल्याचा मुंबईत पक्षाला मोठा फायदा होईल, असे राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.