अमेरिकेला जाण्यासाठी नागपूरच्या महापौरांनी स्वत:च्या मुलाला केले खासगी सचिव

415

नागपूर, दि. १६ (पीसीबी) – अमेरिकेतील महापौरांच्या जागतिक परिषदेला स्वतःच्या मुलाला खासगी सचिव म्हणून सोबत नेल्यामुळे नागपूरच्या महापौर नंदा जिचकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. नंदा जिचकार यांनी मुलगा प्रियांशला महापौरांचा म्हणजेच स्वतःचाच खासगी सचिव म्हणून नेल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरात ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर्स फॉर क्लायमेट ॲण्ड एनर्जी ही परिषद १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान झाली. या परिषदेत हवामान आणि ऊर्जेच्या बदलासंदर्भात जगभरातील महापौर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

या परिषदेत नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी दक्षिण आशियाचे प्रतिनिधित्व करत नागपूरमध्ये वातावरण बदलासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांसंदर्भात सादरीकरण केले. मात्र, परिषदेसाठी जाताना त्यांनी खासगी सचिव म्हणून आपला मुलगा प्रियांशची निवड केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, या परिषदेसाठी प्रियांशचा व्हिसा आणि इतर परवानग्या ग्लोबल कोवेनंट ऑफ मेअर फॉर क्लायमेट ॲण्ड एनर्जी यांनीच काढल्या आहेत. त्याचबरोबर प्रियांशचा अमेरिकेला जाण्या-येण्याचा खर्चही त्यांनीच केला आहे.