अमेरिकेतील रेस्टॉरंटमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या

101

वॉशिंग्टन, दि. ८ (पीसीबी) – अमेरिकेमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. अमेरिकेतील कन्सास शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये तेलंगणाचा रहिवासी असलेल्या २५ वर्षीय शरत कोपू याची अज्ञात हल्लेखाराने हत्या केली. शरत हा युनिव्हर्सिटी ऑफ मिजोरी-कंन्सास सिटीमध्ये शिकत होता.

मिळालेल्या माहितीनुसार शरत याच्यावर बंदुकीतून ५ फैरी झाडण्यात आल्या. कन्सास पोलिसांनी घटनास्थाळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. तसेच हल्लेखोराबाबत माहिती देणाऱ्याला १० हजार डॉलरचे बक्षीस घोषीत केले आहे. येथील पोलिसांनी हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज ट्विटरवर शेअर केले आहे.

शरतचा चुलत भाऊ संदीप वेमुलाकोंडा याने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, अज्ञात हल्लेखोरांच्या एका टोळक्याने कन्सासमधील एका रेस्टॉरंटमध्ये गोळीबार केला. ज्यामध्ये शरत याला पाच गोळ्या लागल्या. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तेथे त्याला मृत घोषीत केले अशी माहिती त्याने एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. संदीपने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रखरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले असून त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.