अमेरिकेतील नागरिक आता ‘या’ कारणामुळे विनामास्क घराबाहेर फिरु शकतात

21

वॉशिंग्टन, दि. २८ (पीसीबी) : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले अमेरिकेतील नागरिक आता विनामास्क घराबाहेर फिरु शकतात. या नागरिकांना छोट्या ग्रुपमध्ये भेटता येईल, परंतु त्यांनी गर्दीची ठिकाणं टाळावीत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन अमेरिकेच्या या संस्थेने मंगळवारी (27 एप्रिल) हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी कोरोनामुक्त झालेल्या इस्रायलने देखील अशाच प्रकारचं पाऊल उचललं होतं. तिथेही काही नियमांसह विनामास्क घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. इस्रायलमधील सुमारे 60 टक्के लोकसंख्येचं लसीकरण झालं आहे.

सीडीसीच्या संचालक रोशेल वेलनेस्की यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्या म्हणाले की, “मागील वर्षभर आम्ही अमेरिकन नागरिकांना काय करु नये हेच सांगत होतो. परंतु हे नागरिक आता काय करु शकतात हे मी आज सांगणार आहे, पण यासाठी त्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं असावं.” त्या पुढे म्हणाल्या की, “ज्या नागरिकांचं पूर्णत: लसीकरण झालं आहे, त्यांना आता थोडं मोकळं झाल्यासारखं वाटत आहे. अशा लोकांना आता ग्रुपमध्ये भेटण्याची मंजुरी दिली आहे. हे लोक आता वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंगसाठी विनामास्क जाऊ शकतात. तसंच एकत्र भेटून मित्रपरिवारासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवण करु शकतात. यादरम्यान मास्क लावण्याची आवश्यकता नाही.

सीडीसीच्या मते, लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याचं कारण म्हणजे हे लोक आता ते कामही करु शकतात, जे त्यांना कोरोना महामारीदरम्यान करता आलं नव्हतं. त्यांना आता फार धोका नाही.

फुल्ली वॅक्सिनेटेड म्हणजे कोण?
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दोन आठवडे झाले आहेत, त्यांचंच फुल्ली वॅक्सिनेटेड अर्थात पूर्णत: लसीकरण झाल्याचं समजलं जाईल. म्हणजेच त्यांनी फायजर-बायोएनटेकसह मॉडर्न लसीचे दोन डोस घेतलेले असतील किंवा जॉन्सन अॅण्ड जॉन्सन लसीचा एकच डोस घेतलेला असेल. सीडीसीने म्हटलं आहे की, लसीकरणाचा अर्थ असा आहे की तुम्हाला धोका कमी आहे.

स्वत:ची काळजी घ्यावी : सीडीसी
लसीकरण पूर्ण झालं असली तरी या नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणं गरजेचं असल्याचं सीडीसीने म्हटलं आहे. विनामास्क घराबाहेर पडण्याआधी त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, यामुळे कुटुंबाला किंवा इतरांना कोणता धोका तर नाही. जर लसीकरण झालेले लोक गर्दीच्या ठिकाणी किंवा इनडोअर आऊटिंगला जात असतील तर त्यांनी मास्क जरुर वापरावा, असं सीडीसीचं म्हणणं आहे.

WhatsAppShare