अमेरिकेतील घटनेनंतर आता भारतातही वन्यप्राण्यांच्या सुरक्षेत वाढ

81

 

पुणे, दि.७ (पीसीबी) – अमेरिकेमध्ये एका वाघिणीला करोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर, मनुष्यापासून प्राण्यांमध्ये हा विषाणू लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पांनी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवाव्यात अशी सूचना मंत्रालयातर्फे करण्यात आली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्राण्याद्वारे माणसांना किंवा माणसांद्वारे प्राण्यांना हा विषाणू संक्रमित होणार नाही. याबाबत सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पांनी तातडीने उपाययोजना राबवून, मंत्रालयाकडे अहवाल द्यावा. प्राणी आणि व्यक्तींमध्ये अधिक संपर्क न होण्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पर्यटन, संशोधन आदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणांवर राष्ट्रीय उद्याने, अभयारणे आणि व्याघ्र प्रकल्पांना भेटी देतात. या पार्श्वभूमीवर या गोष्टींना अटकाव करावा. यासह प्रकल्पांशी संबंधित कर्मचारी, पर्यटन आणि स्थानिक ग्रामस्थांनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अटींचे पालन करण्याचे नमूद केले आहे.

कोरोना संक्रमणाच्या सुरवातीच्या काळात घरातील पाळीव प्राण्यांपासून देखील कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती वर्तवली होती. या भीतीमुळे अनेक नागरिकांनी आपल्या घरातील पाळीव प्राणी बाहेर सोडून दिली. मात्र पाळीव प्राण्यांपासून कोरोना होत नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली होती.

WhatsAppShare