अमित शहा यांना अमोल कोल्हे यांच्या ‘अशा’ही शुभेच्छा

98

पुणे, दि. २२ (पीसीबी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. त्या निमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकीय क्षेत्रातूनही त्यांचं अभिष्टचिंतन केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासाठी त्यांनी खास व्हिडिओ ट्वीट केलं आहे. हे ट्वीट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे.

अमोल कोल्हे यांनी ट्वीट केलेला हा व्हिडिओ हिंदी भाषेत आहे. त्याद्वारे त्यांनी अमित शहा यांना उपरोधिक शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील निवडक मोठ्या नेत्यांमध्ये आज अमित शहा यांची गणना होते, अशा शब्दांत गौरव करून डॉ. अमोल कोल्हे आपल्या ट्वीटमध्ये पुढं म्हणतात, ‘पेट्रोल, डिझेलच्या दरांप्रमाणे तुम्ही आयुष्याचं शतक साजरं करा… ज्या पद्धतीनं खाद्यतेलांच्या किंमतींचा आलेख वाढत चाललाय, त्याच पद्धतीनं तुमच्या कर्तृत्वाचा आलेख वाढत राहो… ज्याप्रमाणे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती अगदी काही दिवसांत दुप्पट झाल्यात, त्याचप्रमाणे आपल्याला यश मिळो… सर्वसामान्य नागरिकांना महागाई आणि बेरोजगारीच्या कचाट्यातून सोडवण्याची शक्ती आई जगदंबा आपल्याला देईल, ही प्रार्थना करतो.’

अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. खासदार म्हणून निवडून आल्यापासून संसदेत कोल्हे यांनी केलेली अनेक भाषणं गाजली आहेत. आरोप करण्यापेक्षा सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याकडं त्यांचा कल राहिला आहे. अमित शहा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी पुन्हा एकदा देशातील वास्तव परिस्थितीकडं केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

WhatsAppShare