अमित शहा – माधुरी दिक्षित भेटीवर राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून फटकारे

7

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज (बुधवार) मुंबई दौऱ्यावर आले आहेत.  पक्षाच्या समर्थन वाढीसाठी लोकसंपर्क अभियानांतर्गत त्यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीतील व्यंगचित्रातून फटकारे मारले आहेत. 

अमित शहा यांनी माधुरी दीक्षित, लता मंगेशकर यांची भेट घेण्याची गरज काय ? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. यावरच राज यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. नुकताच माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट सिनेमा प्रदर्शित झाला. त्याच चित्रपटाच्या नावाचा वापर करुन राज यांनी सुरेख व्यंगचित्र रेखाटले आहे.

अमित शहा त्यांच्या हातातील यादी पाहत असून त्यामध्ये माधुरी, लतादीदी, कपिलदेव, उद्धव, मिल्खासिंग ही नावे आहेत. त्याचवेळी शहांनी खरंतर ज्या भाजप कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहित करणे अपेक्षित होते. तोच भाजप कार्यकर्ता अमित शहा त्यांची बकेट लिस्ट तपासत असताना त्यांच्याकडे आशाळभूतपणे पाहत असल्याचे दाखवण्यात आले आहे.