अमित शहांनी बोलावली गुरूवारी महत्त्वाची बैठक

31

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री  अध्यक्ष अमित शहा यांनी गुरूवारी (दि.१३) दिल्लीत राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. भाजपाचे सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, संघटन मंत्री आणि राज्य प्रभारींना बैठकीसाठी बोलावले आहे. भाजपातंर्गत संघटनात्मक पातळीवर निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात ही बैठक बोलावली आहे.

नव्या भाजपा अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी राष्ट्रीय पदाधिकारी एकत्र येतील. भाजपाचे विद्यमान अध्यक्ष अमित शाह मोदी सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांचा पक्षाध्यक्ष म्हणून तीन वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आला. पण त्यांना पदावर कायम रहाण्यास सांगण्यात आले. लोकसभा निवडणुका असल्याने पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.

उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांसाठी प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल. अलीकडेच लोकसभा निवडणुकीत भाजपाने या दोन राज्यात दमदार कामगिरी केली होती. महत्वाच्या पदांसाठी निवडणुकीसह पक्ष नोंदणी अभियानही भाजप लवकरच सुरु करणार आहे.