अमित शहांनी जाणून घेतली हिंसक मराठा आंदोलनामागची कारणे!

357

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याची गंभीर दखल घेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप खासदारांची तातडीने बैठक बोलावली. यावेळी आंदोलन पेटण्याची कारणे खासदारांनी अमित शहांच्या कानावर घातली. मराठा आंदोलनांपूर्वी शांततेत निघालेल्या मराठा मोर्चांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली नाही, त्यामुळेच मराठा आंदोलनांचा भडका उडाला, असे भाजप खासदारांनी सांगितल्याचे सूत्रांकडून समजते.

या बैठकीतही मराठा व अन्य समाजांच्या आरक्षण आंदोलनांबाबत चर्चा झाल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली. या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे उपस्थित होते. यापूर्वीच्या सरकारांनी आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही व आता वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे खासदारांनी सांगितले.

मात्र, महाराष्ट्रातील भाजप सरकारची नीती व नियत चांगली आहे, त्यामुळेच मराठा आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत, असा सकारात्मक संदेश राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचवा, अशा सुचना शहा यांनी खासदारांना दिल्या आहेत.