अमित शहांची मनधरणी निष्फळ; शिवसेना स्वबळाच्या निर्णयावर ठाम

112

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – युती कायम राहण्यासाठी शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी (दि. ६) मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, या भेटीतून निष्पन्न काहीही झालेले नाही. शिवसेना आपल्या स्वबळाच्या निर्णयावर ठाम आहे. शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. तसा ठराव देखील पक्षाच्या बैठकीत मंजूर केला आहे. त्यामुळे या निर्णयात बदल होणार नाही, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले.

स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक असल्याचे वृत्तही समोर आले होते. दुरावलेल्या दोन्ही पक्षांमध्ये या भेटीनंतर समझोत्याची    चिन्हे दिसत होती. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये आणखी एक भेटी होणार असल्याचे सांगितले जात होते.

या घडामोडीवर आज (गुरुवारी) शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका वृत्तसंस्थेला अमित शहा- उद्धव ठाकरे भेटीवर प्रतिक्रिया दिली. ‘आम्हाला अमित शाह यांच्या अजेंड्याची माहिती आहे. मात्र, शिवसेनेने यापुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव मंजूर केला आहे. आता या निर्णयात बदल होणार नाही, असे राऊत म्हणाले.