अमरावतीमध्ये आरोपींना मारहाण केल्याच्या रागातून सहाय्यक पोलीस निरीक्षकाची हत्या

794

अमरावती, दि. ४ (पीसीबी) – जिल्ह्यातील अचलपूर येथे आज (मंळवार) पहाटे चारच्या सुमारास पेट्रोलिंगदरम्यान सहायक पोलीस उपनिरीक्षकाची चार ते पाच गुंडांनी लोखंडी रॉडने डोक्यात वार करुन निर्घृण हत्या केली.

शांतीलाल चुणीलाल पटेल (वय ५२) असे हत्या झालेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक जण पसार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अचलपूर पोलीस ठाण्यातील पीएसआय शुभांगी ठाकरे यांनी सोमवारी रात्री सात ते आठ आरोपींना भर रस्त्यावर दारूचे सेवन करताना पाहिले होते. त्यांना हटकले असता ते पळून गेले. मात्र, काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींना पोलिसांनी मारहाणही केली. याचा राग मनात ठेवून आरोपींनी शुभांगी ठाकरे यांचा पाठलाग केला. मात्र, त्या कुठेही सापडल्या नाहीत. आज पहाटे चारच्या सुमारास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शांतीलाल पटेल पेट्रोलिंगसाठी निघाले असता चार ते पाच गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले. या हल्ल्यात पटेल गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, अचलपूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने अमरावती शहर परिसरात खळबळ उडाली आहे.