अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जबर धक्का; कोर्टाने जात प्रमाणपत्र रद्द करत ठोठावला ‘एवढ्या’ लाखांचा दंड

42

अमरावती, दि.०८ (पीसीबी) : समोर आलेल्या माहितीनुसार युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना जबर धक्का बसला असून इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. नवनीत राणा या 2019 साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या हेविवेट नेत्यांपैकी एक असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला.

शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना हायकोर्टानं 2 लाखांचा दंडदेखील सुनावला आहे. नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता.

नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची खासदारी धोक्यात असल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रमाणप्रत्र किंवा प्रतिज्ञापत्र खोटं ठरलं तर संबंधित सदस्याच पद रद्द होऊ शकतं. मात्र आता नवनीत राणा यांच्याबाबत काय निर्णय होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने जरी रद्द केलं असलं, तरी राणा यांना सुप्रीम कोर्टाचा पर्याय आहे. नवनीत राणा आता सुप्रीम कोर्टात धाव घेऊन, हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात.

WhatsAppShare