अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाच्या ट्विटमुळे राम कदम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

1419

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – दहिहंडी उत्सवामध्ये महिलांविषयी वादग्रस्त विधान करणारे भाजप आमदार राम कदम आणखी एका  वादाच्या भोवऱ्यात अडकले  आहेत. परदेशात उपचारासाठी गेलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचे निधन झाल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.  राम कदम या  ट्विटमुळे आता पुन्हा  अडचणीत येण्याची शक्यता आहे.  

‘हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाची बेंद्रे पडद्याआड’, असे ट्विट त्यांनी केले होते.

दरम्यान, हे ट्विट चुकीचे असल्याचे लक्षात येताच ते डिलीट करण्यात आले आहे. मात्र, स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सध्या ते बरंच व्हायरल झाले आहे. आपली या चुकीवर पांघरूण घालण्यासाठी राम कदम यांनी आणखी एक ट्विट केले आहे.  गेल्या दोन दिवसांपासून सोनाली बेंद्रेच्या प्रकृतीविषयीच्या अफवा पाहायला मिळत आहेत, मी त्यांच्या हितासाठी आणि उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करतो,  असे ट्‌विट त्यांनी केले आहे.