अभाविपने स्वामी विवेकानंदांचे प्रलंबित पुतळ्याच्या ठिकाणी प्रतिमा बसवून केले पूजन

84

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – अखंड भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी जागृत केले, असे स्वामी विवेकानंद, त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो. पिंपरी चिंचवड शहरात बऱ्याच वर्षांपासून स्वामीजींच्या पुतळ्याचा विषय प्रलंबित आहे. पिंपरी ते चिंचवड लिंक रोडवर (स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग) स्वामी विवेकानंद चौक येथे, स्वामी विवेकानंद स्मारकासाठी जागा व त्यावर बांधकाम पूर्ण झाले आहे. तरीसुद्धा त्या जागेवर स्वामीजींचा पुतळा बसवण्यात येत नाहीये. अभाविप च्या कार्यकर्त्यांनी त्याच जागेवर स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा ठेवून पूजन केले.

पुतळा स्मारकासाठी राखून ठेवलेली ही जागा अक्षरशः झाडे झुडपे यांनी वेढली गेली आहे. मद्य प्रेमींनी तेथे मद्याच्या बॉटल फेकलेल्या आढळल्या आहेत. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज ती सर्व झाडे – झुडपे व कचरा साफ केला. या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी चिंचवड महानगरा च्या वतीने स्मारकाच्या ठिकाणी प्रतिमा बसवून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यवाह सीए माहेश्वरजी मराठे, सहकार भारतीचे संजय कुलकर्णी यांची होती. स्वप्नील जोशी ,बालाजी मोरे ,अभाविप पिंपरी चिंचवड महानगर मंत्री संभाजी शेंडगे, तेजस चवरे, अथर्व देवकर , प्रितेश पाटील, वैदेही जोशी, रिया कच्छवा, ऋत्विक देशपांडे, राधेय मोहगावकर, प्रफुल्ल आडे, वैभव बिरंगळ, अशोक सैनी , राजकुमार जाधव, बाळाराम माडकर , स्वप्नीलजी मोहरील आदी उपस्थित होते.