अबब…तब्बल दहा वाहनांची जाळपोळ

1

पिंपरी , दि. 13 (पीसीबी): वाहण तोडफोड, जाळपोळ घटना वाढत आहेत. दोन तरुणांच्या झालेल्या भांडणातून एका तरुणाने जवळपास दहा वाहनांची जाळपोळ केली. ही घटना काकडे टाऊनशिप चिंचवड येथे बुधवारी पहाटे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुणांनी एकत्र कॅमेरा घेतला होता. मात्र एक तरुण त्यातील कॅमेराचे हप्ते देत नसल्याने दुसऱ्या तरूणाने कॅमेरा स्वतःकडे ठेवून घेतला. यामुळे त्या दोन तरुणांमध्ये जोरदार भांडण झाले. बदला घेण्यासाठी एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची गाडी जाळली. मात्र पेटवलेल्या गाडीमुळे इतर दहा दुचाकी ही त्या गाडीच्या आगीच्या संपर्कात आल्याने त्यांनी देखील पेट घेतला.

मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी बिल्डिंगमधील नागरिक झोपेत होते. अचानक आग लागल्यामुळे व मोठ्या प्रमाणात धूर झाल्यामुळे त्यांनाही काय उपाययोजना करावी सुचत नव्हते. काही नागरिकांनी अग्निशामकशी संपर्क केल्यावर अवघ्या काही मिनिटातच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत दहा गाड्या जळून खाक झाल्या होत्या.

सीसीटीव्ही फुटेज वरून घटना आली उघडकीस
ज्या इमारतीमध्ये वाहनांची जाळपोळ करण्यात आली त्या इमारतीमध्ये काही महिन्यांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र गाड्या कोणी जाळल्या याबाबत कोणालाही कल्पना नव्हती. येथील रहिवाशांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर गाड्या जाणाऱ्या तरुणाचा शोध लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे.

WhatsAppShare