अबब… कोरोनामध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर

70

मुंबई, दि. ६ (पीसीबी) : कोरोना रुग्णांच्या संख्येत भारताने रशियालाही मागे टाकले आहे. भारतात दिवसभरात 23 हजार 165 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 लाख 97 हजार 69 वर पोहोचला आहे. याशिवाय भारतात कोरोनामुळे एकूण 19 हजार 699 मृत्यू झाले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या जागतिक क्रमवारीत रशिया तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, भारतात आज दिवसभरात 23 हजारांहून जास्त रुग्ण आढळल्यामुळे भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रशियातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 लाख 81 हजार 251 वर पोहोचला. तर मृतांचा आकडा 10 हजार 161 इतका आहे. रुग्णांच्या संख्येत अशीच रोज २५ हजाराने वाढ होत राहिली तर महिनाभरात भारत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझिललाही मागे टाकेल आणि पुढच्या दोन महिन्यांत पहिल्या क्रमांकावरील अमेरीकेच्याही पुढे असणार आहे. लॉकडाऊन खुला केल्या पासून भारतामधील रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी कमी होत गेला. सुदैवाने रुग्ण रिकव्हरी चांगली आहे आणि मृत्यूचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत भारतात कमी आहे

दरम्यान, भारतात कोरोनाची लस १५ ऑगस्ट पर्यंत येऊ शकते असे राज्यकर्ते सांगत असले तरी किमान कालावधी १८ महिने लागेल असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे देशासाठी हा अत्यंत चिंतेचा विषय आहे.

कोरोना रुग्णांच्या जागतिक क्रमवारीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर ब्राझील देश आहे. या दोन्ही देशांमध्ये कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. अमेरिकेत तर कोरोना रुग्णांचा आकडा 29 लाख 59 हजार 942 वर पोहोचला आहे. यापैकी 1 लाख 32 हजार 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 15 लाख 79 हजार 837 वर पोहोचला आहे. यापैकी 64 हजार 383 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, भारतात आतापर्यंत 4 लाख 24 हजार 885 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 लाख 52 हजार 485 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. भारतात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे.

चीन 22 व्या क्रमांकावर

चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. मात्र, कोरोना रुग्णसंख्येच्या जागतिक क्रमवारीत चीन 22 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. चीनमध्ये 83 हजार 553 रुग्ण आढळले होते. यापैकी 78 हजार 516 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या चीनमध्ये 403 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

महाराष्ट्रात दिवसभरात 6,555 नवे कोरोना रुग्ण

राज्यात काल दिवसभरात (5 जुलै) 6 हजार 555 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 6 हजार 619 वर पोहोचला आहे. राज्यात दिवसभरात 3 हजार 658 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 1 लाख 11 हजार 740 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण 8 हजार 822 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

WhatsAppShare