अपहरण केलेल्या वकिलाचा खून, तीन संशयितांना अटक

37

पुणे, दि. १९ (पीसीबी) –  येथील शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून एका वकिलाचे अपहरण करून, तिघांनी खून केल्याची घटना समोर आली आहे. अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बालाजी नगर येथे राहणारे उमेश चंद्रकांत मोरे यांचा खून झाला आहे. तर या प्रकरणी कपिल विलास फलके (वय ३४ चिखली) दीपक शिवाजी वांडेकर (वय २८ बीड) आणि रोहित दत्तात्रय शेंडे (वय ३२ मार्केट यार्ड पुणे)  हे तीन आरोपी आहेत.

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले की, शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून १ ऑक्टोबर रोजी उमेश चंद्रकांत मोरे हे बेपत्ता झाले. ते घरी आले नसल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार उमेश यांचा शोध घेण्यासाठी तीन पथकांची नेमणूक करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर उमेश यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्ती कडे चौकशी केली. शिवाजीनगर परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासण्यात आले.

उमेश यांचा शोध सुरू असताना. ताम्हीणी घाटात त्यांचा खून झाल्याची माहिती मिळाली. तेथील घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला असून या प्रकरणी कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडेकर आणि रोहित दत्तात्रय शेंडे या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या खून प्रकरणी कबुली दिली आहे. त्या तिघांकडे अधिक चौकशी केली असता जमिनीच्या वादातून खून केल्याचे सांगितले असून आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

बार असोसिएशनकडून निषेध –

ॲड उमेश मोरे यांची हत्या करणे हे घृणास्पद कृत्य तर आहेच, पण या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. यामुळेच आरोपींना कोणीही सदसद्विवेकबुद्धी असणाऱ्या,  वकील बांधवांनी वकीलपत्र घेऊ नये, असे आवाहन पुणे बार असोसिएशनचे अध्यक्षांनी केले आहे.

WhatsAppShare