अपघाताने मंत्री झालेल्या चंद्रकांतदादांनी माझ्याविषयी जपून बोलावे – शरद पवार

7936

कोल्हापूर, दि. २८ (पीसीबी) – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे अपघाताने मंत्री झालेले आहेत. त्यामुळे  पाटील यांनी  माझ्याविषयी बोलताना जरा जपून बोलावे. मी माझ्या राजकीय कारकीर्दीत १४ निवडणुका   लढवल्या आहेत. यापैकी  ७ निवडणुका थेट जनतेमधून लढून जिंकल्या आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगून मंत्री पाटील यांच्यावर तोफ डागली.    

कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की, मंत्री पाटील यांनी अद्याप एकही निवडणूक जनतेमधून लढवलेली नाही. पाटील यांनी आधी एक  निवडणूक जनतेमधून लढवून दाखवावी, आणि मगच माझ्यावर बोलावे, असा टोला पवार यांनी लगावला.

काहीही विधान करून खळबळ उडवून देणे,  हे मंत्री पाटील यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांची विधाने गांभीर्याने घेण्यासारखी नाहीत. त्याचबरोबर हीच गोष्ट मुखमंत्र्यांना लागू  होत आहे. एक गोष्ट चांगली आहे, येणाऱ्या काळात निवडणूक होणार आहेत. त्याचा आम्हालाच फायदा होईल,  असा टोलाही त्यांनी  यावेळी लगावला.  राज्यात मराठा समाजाचा उद्रेक सुरू असून आगीत तेल ओतण्याचे काम मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील करत आहेत, असे पवार म्हणाले.