अपघाताचा बहाणा करून पैशांची मागणी आणि केलं असं काही कि…

65

पिंपरी, दि.२३ (पीसीबी) : वाहनांचे पार्ट घेऊन औरंगाबाद येथे जात असलेल्या एका आयशर ट्रकला कार आडवी घालून ट्रकचा धक्का लागल्याने ट्रक चालकाला तिघांनी मारहाण केली. तसेच दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करत चालकाला मोरेवस्ती काळूस येथे नेऊन एका खोलीत डांबून ठेवले. हा प्रकार रविवारी (दि. 21) मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास मोरेवस्ती, काळूस येथे घडला.

विठ्ठल लक्ष्मण मोरे (वय 55), महेश विठ्ठल मोरे (वय 28), योगेश विठ्ठल मोरे (वय 31, सर्व रा. मोरेवस्ती, काळूस) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ट्रक चालकाने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चाकण येथील एका कंपनीतून औरंगाबाद येथील कंपनीत वाहनांचे पार्ट घेऊन जात होते. चाकण-शिक्रापूर रोडने जात असताना मोरेवस्ती येथे आरोपींनी त्यांची कार कोणताही इंडिकेटर न देता अचानक फिर्यादी यांच्या ट्रक समोर आणली. त्यात ट्रकचा कारला धक्का लागला. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण केली. नुकसान भरपाई म्हणून दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यानंतर गाडी सोडू अशी आरोपींनी धमकी दिली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीला ट्रकमध्ये बसवून ट्रक मोरेवस्ती काळूस येथे नेले. तिथे ट्रकची चावी, मोबाईल, कागदपत्रे काढून घेऊन फिर्यादीस एका खोलीत कोंडून ठेवले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare