….अन् भाजपचे गोंधळलेले प्रथम महापौर पायउतार झाले!

5558

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्ता स्थापन केलेल्या भाजपचे प्रथम महापौर नितीन काळजे यांच्या राजीनाम्याने एका गोंधळलेल्या महापौरपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. दुसऱ्यांदा नगरसेवक झालेल्या काळजे यांना सत्ताधारी भाजपने महापौरपदाची संधी दिली. परंतु, त्यांना ना सभागृह नीट चालविता आले ना ते पक्षाचा चेहरा बनू शकले. महापालिकेत काय चाललेय असा प्रश्नचिन्ह नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. त्यांच्या या गोंधळलेल्या अवस्थेचा विरोधकांनी पुरेपूर फायदा उचलला. काळजे यांच्याकडील निर्णयक्षमतेच्या अभावामुळे सभागृहात भाजपला प्रत्येकवेळी नामुष्की पत्करावी लागली. त्यामुळे काळजे यांनी पदाचा राजीनामा दिला आणि भाजपचे गोंधळलेले प्रथम महापौर पायउतार झाले, अशीच प्रतिक्रिया महापालिका वर्तुळात व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे पिंपरी-चिंचवड एवढे घट्ट राजकीय समीकरण बनले होते. परंतु, फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला. महापालिकेतील सत्ता खेचून आणली. निवडणुकीत स्पष्ट बहुमत प्राप्त केल्याने महापालिकेत प्रथमच भाजपचे कमळ फुलले. महापालिकेत भाजपची सत्ता येण्यासाठी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची राजकीय ताकद आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे व भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराविरोधात पेटविलेले रान कारणीभूत ठरले.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिला महापौर कोण होणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती. कायद्यानुसार अडीच वर्षांसाठी महापौरपद ओबीसीसाठी राखीव आहे. पक्षाने मूळ ओबीसी नगरसेवकांना डावलून भोसरी विधानसभा मतदारसंघातील कुणबी-मराठा ओबीसी नितीन काळजे यांच्यावर विश्वास दाखवला. काळजे हे आमदार महेश लांडगे यांचे जवळचे नातेवाइक आहेत. त्यामुळे लांडगे यांनीही काळजे यांच्यासाठी राजकीय ताकद पणाला लावली आणि हे पद खेचून आणले. भाजपने महापालिका निवडणुकीत शहरवासीयांना अनेक आश्वासने दिल्यामुळे सत्ता राबविताना पक्षाचे प्रथम महापौर म्हणून काळजे हे कारकिर्द गाजवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

प्रत्यक्षात महापालिकेत उलटेच चित्र पाहायला मिळाले. काळजे हे दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांना महापालिकेचा कारभार आणि सभाशास्त्राची माहिती असणे अपेक्षित होते. परंतु, महापौरपदाच्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी ना कारभाराची चुणूक दाखविली ना सभाशास्त्रानुसार सभागृह चालवून विरोधकांना नामोहरम केले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी “महापालिकेत चाललेय तरी काय?”, असा प्रश्नचिन्ह दिसून आला. सभागृहात ते नेहमी गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांच्या या गोंधळलेल्या स्वभावाचा विरोधकांनी पुरेपूर फायदा उचलला. महापौर काळजे यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्वसाधारण सभांमध्ये विरोधकांनी गोंधळ घातला नाही आणि महापौरांनी गोंधळलेले निर्णय घेतले नाहीत, अशी एकही सभा पार पडली नाही.

सर्वसाधारण सभांमध्ये विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांनी महापौर नितीन काळजे कावरे बावरे होऊन जात. सभागृहात विरोधकांचा गोंधळ वाढला की सत्तारूढ पक्षनेते आणि आपल्याच पक्षाचे अनुभवी नगरसेवक सभागृहात काय सूचना करतात आणि सभागृह नीट चालविण्यासाठी काय इशारे देतात, याकडे दुर्लक्ष करून महापौर पुरते गोंधळून जात. नेमकी हीच नस पकडून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला सभागृहात नेहमी कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले. त्यात विरोधकांना यशही आले. सत्तेच्या पहिल्या सव्वा वर्षातच सभागृहामध्ये भाजपला गार करण्याचे तंत्र विरोधकांनी विकसित केले, त्याचे संपूर्ण श्रेय नितीन काळजे यांना जाते. सभागृहाच्या बाहेरही नितीन काळजे पक्षाचा चेहरा बनू शकले नाहीत.

दोन्ही आमदारांमध्ये समन्वय साधून सत्ता राबविण्याची राजकीय कला त्यांच्यात दिसून आली नाही. त्याचा गैरफायदा उठवत शिवसेनेने महापौरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपमध्ये वादाची ठिणगी टाकली. महापालिकेच्या विकासकामांचे भूमीपूजन किंवा उद्घाटन करताना त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांना विश्वासात घ्यावे, एवढी साधी राजकीय समजही महापौर काळजे यांना दाखविता आली नाही. त्यातून स्वपक्षाचेच शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना डावलून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे महापौरांच्या हस्ते भूमीपूजन करून घेण्याचा डाव विरोधकांनी साधला. अशा अनेक कारणांमुळे नितीन काळजे म्हणजे गोंधळलेले महापौर अशीच त्यांची प्रतिमा निर्माण झाली. त्यांनी १७ महिने महापौरपद उपभोगल्यानंतर मंगळवारी (दि. २४) पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपचे गोंधळलेले प्रथम महापौर पायउतार झाले, अशीच प्रतिक्रिया महापालिका वर्तुळात व्यक्त होत आहे.