…अन्यथा दोन महिन्यात जेट एअरवेजला ठोकावे लागणार टाळे

92

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – एअरलाइन कंपनी जेट एअरवेज सध्या आर्थिक अडचणीत अडकली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना खर्च कमी करण्यासाठी उपाय न केल्यास ६० दिवसानंतर ऑपरेट करणं अशक्य असेल असं सांगितलं आहे. खर्च कमी करण्यासाठी जे उपाय सुचवण्यात आले आहेत त्यामध्ये कर्मचाऱ्यांची पगारकपात करण्याचाही उल्लेख आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजी पसरली असून नोकरीवर कुऱ्हाड आल्याने भीती निर्माण झाली आहे. जेट एअरवेजच्या दोन अधिकाऱ्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की, चेअरमन नरेश गोयल यांच्यासहित व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना कंपनीची आर्थिक स्थिती योग्य नसून, खर्च कमी करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्या लागतील.

जेट एअरवेजच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे की, ‘आम्हाला सांगण्यात आलं आहे की दोन महिन्यानंतर कंपनी चालवणं अशक्य होईल. व्यवस्थापनाला पगारकपात आणि दुसऱ्या उपाययोजना करत खर्च कमी करण्याची गरज आहे. असे केले तरच ६० दिवसांनंतर कंपनीचे कामकाज सुरु ठेवणे शक्य आहे. इतकी वर्ष कंपनीने आम्हाला यासंबंधी काहीच सांगितले नाही आणि आता थेट ही माहिती दिली गेल्याने आम्ही चिंताग्रस्त आहोत. यामुळे कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापनावरील विश्वास कमी झाला आहे’.