अनुष्का शर्मा पहिल्या रांगेत, तर अजिंक्य रहाणे मागच्या रांगेत  

497

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने लंडनमधील भारताच्या उच्च आयोगाला भेट दिली. यावेळी पूर्ण संघासह कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. या भेटीनंतर बीसीसीआयने एक फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. परंतु या फोटोवर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्का शर्मा पहिल्या रांगेत दिसत आहे. तर संघातील इतर खेळाडूंच्या पत्नी येथे उपस्थित नव्हत्या. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे मागच्या रांगेत उभा आहे. नियमानुसार, तो विराट कोहलीच्या बाजूला उभा असायला हवा होता. त्यामुळे या फोटोवर आक्षेप नोंदवले जात आहेत.

एखाद्या दौऱ्याच्या पहिल्या दोन आठवड्यात खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेण्ड त्यांच्यासोबत जाऊ शकत नाहीत. तर दोन आठवड्यानंतर केवळ १४ दिवसांसाठीच त्या क्रिकेटरसोबत राहू शकतात, असा नियम बीसीसीआयने केला होता. मात्र, अनेक खेळाडूंच्या पत्नी सध्या लंडनमध्येच आहेत. त्यामुळे केवळ अनुष्काच्या उच्च आयोगातील उपस्थितीवर सवाल उपस्थित केले जात आहेत.