अनिल परब यांना झटका! दापोलीतील रिसॉर्ट बांधकाम तोडण्यासाठी केंद्रीय पर्यावरण खात्याकडून कारणे दाखवा…

131

मुंबई, दि. २५ (पीसीबी) : परिवहन मंत्री अनिल परब यांना केंद्राच्या पर्यावरण विभागानं झटका दिला आहे. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर परब अडचणीत आले आहेत.
राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना केंद्राच्या पर्यावरण खात्यानं मोठा झटका दिला आहे. परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टचं बांधकाम तोडण्यासाठी भारत सरकारच्या पर्यावरण खात्यानं कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोली मुरुड येथे कोविड काळात अनिल परब यांनी अनाधिकृत साई रिसॉर्ट CRA नियमांचे उल्लंघन करुन बांधले अशी तक्रार सबंधित कार्यालयात केली होती. मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील बांधलेले साई रिसॉर्ट हे अनधिकृतरित्या बांधले ते तोडण्यासंबंधीची नोटीस भारत सरकारद्वारे 17 डिसेंबर 2021 रोजी पाठवण्यात आली आहे.
या नोटीसमध्ये 15 दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीसचे उत्तर देण्याचे सांगण्यात आले आहे.NCSCM, SCZCM यांचे सीआरझेड 3 संबंधीचे नकाशे ही साई रिसॉर्ट एन एक्स, सी कौंच बीच रिसॉर्ट वर अनिल परब यांना पाठवण्यात आले आहे.
साई रिसॉर्ट एन एक्स हे दोन मजली अनधिकृत रिसॉर्ट आहे. सी कौंच बीच रिसॉर्ट हा तळ मजला + पहिला मजला आणि दुसऱ्या मजल्यावरील स्ट्रक्चर कव्हर करण्यात आले आहे. या रिसॉर्टमध्ये प्रवेश करण्यासाठी समुद्राच्या वाळूतून अनधिकृत रस्ता दिला गेला आहे. सीआरझेड नोटिफिकेशन 2011 च्या कलम 8 च्या अंतर्गत ही नोटीस देण्यात आली.गेल्या 2-3 वर्षात हे बांधकाम करण्यात आले, याचे सॅटेलाईट नकाशे व पुरावे ही नोटीस सोबत देण्यात आले आहेत.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी जून 2021 मध्ये या दोन्ही अनधिकृत रिसॉर्टची पाहणी केली होती,त्याचा अहवाल केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला पाठवला होता. त्या अंतर्गत ही कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे रिसॉर्ट पाडण्याचे अंतिम आदेश येईल असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.