अनागोंदी आणि भ्रष्ट्र कारभार प्रकरणी स्पर्श चा ठेका तात्काळ रद्द करण्याची योगेश बहल यांची मागणी

216

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – स्पर्श हॉस्पीटलकडून सुरू असलेल्या अनागोंदी आणि भ्रष्ट्र कारभार प्रकरणी त्यांचा ठेका तात्काळ रद्द करून संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर येथे कोविड समर्पित रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयामध्ये मेडिकल आणि पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याचा ठेका स्पर्श हॉस्पीटल (फॉर्च्यून स्पर्श हेल्थकेअर प्रा.लि.) या ठेकेदार कंपनीला देण्यात आलेला आहे. या ठेकेदाराकडून सुरू असलेल्या महापालिकेच्या फसवणुकीबाबत व भ्रष्ट कारभाराबाबत मी गेली तीन ते चार महिन्यांपासून पुराव्यानिशी आपल्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत आहे. मात्र आपण त्याकडे दूर्लक्ष केल्यामुळे निर्ढावलेल्या स्पर्शच्या व्यवस्थापनाने महापालिकेचे काही अधिकारी, सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांशी संगनमत करून ऑटो क्लस्टर येथे अक्षरश: बेजबाबदार कारभाराचा कळस गाठला आहे. कोविड महामारीमध्ये महापालिकेने हाती घेतलेल्या रुग्णसेवेसारख्या चांगल्या उपक्रमाला स्पर्शकडून हरताळ फासला जात आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांनी कररुपाने पालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या रक्कमेचाही अपहार सातत्याने सुरू आहे.

गेल्या पंधरा दिवसांत स्पर्शच्या गैरकारभाराचे दोन उदाहरणे समोर आली आहेत. तर या प्रकरणी आतापर्यंत सातजणांना अटक झाली आहे. मी निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ कारवाई केली असती तर या ठिकाणी सुरू असलेला गैरप्रकार थांबविता आला असता. २९ एप्रिलपुर्वीपासून या कंपनीचा ठेका काढून घेण्याबाबत मी वारंवार विनंती केल्यानंतरही कोणताच निर्णय आयुक्त या नात्याने आपण न घेता त्याकडे दूर्लक्ष केल्यामुळेच स्पर्शचे व्यवस्थापन निर्ढावल्याचे स्पष्ट झाले आहे. ३० एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत बेडसाठी घेतल्या जात असलेल्या पैशांबाबत मी सभागृहात अनेक बाबी निदर्शनास आणून दिल्यानंतरही आपण या ठेकेदारावर कोणतीच कारवाई केली नाही. याच सभेत मी व्यक्तीश: ऑटो क्लस्टरमधून रेमडेसीवीरचा काळाबाजार सुरू असल्याचेही मी आपल्या निदर्शनास आणून दिले होते. माझ्या भाषणात मी त्याचा उल्लेख करून कारवाईची विनंती केली होती. मात्र या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा आपण जो दुर्देवी निर्णय घेत आहात त्यामुळे आज (दि. 8-5-2021) रोजी रेमडेसीवीर काळ्या बाजारात विकताना स्पर्शच्या कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे, असे बहल यांनी नमूद केले आहे.

महापालिकेची अतोनत बदनामी –
हा संपूर्ण प्रकार केवळ आपल्याकडून स्पर्शवर कारवाई करण्यास होत असलेल्या विलंबामुळेच होत असून चुकीच्या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा आपण जो प्रकार चालविला आहे त्यामुळे महापालिकेचीही अतोनात बदनामी होत आहे. स्पर्श हा ठेकेदार महापालिकेच्या अधिनियमातील तरतूद 59 नुसार काम करण्यास अपात्र ठरत आहे. त्यांच्या पत्नी महापालिकेच्या वैदयकीय विभागात कार्यरत असतानादेखील आपण घेत असलेली बोटचेपी भूमिका ही निश्चितच दुर्देवी आहे, अशी टीका योगेश बहल यांनी केली आहे.
सत्ताधारी, प्रशासकीय अधिकारी आणि स्पर्श यांच्याकडून महापालिकेची लूट सुरू असून सर्वसामान्यांचे पैसे ओरबडण्याचे काम सुरू आहे. महापालिका आयुक्त म्हणून हा प्रकार थांबविण्याची आपली जबाबदारी आहे. आपणास या पत्राद्वारे मी गांभिर्याने विनंती करतो की, आपणास आयुक्त म्हणून जर या बाबींचे महत्त्व समजत नसले तरी सक्षम विरोधीपक्ष म्हणून तसेच एक जेष्ठ लोकप्रतिनिधी या नात्याने महापालिकेच्या प्रतिमेची आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची जपणूक करणे हे आमचे कर्तव्य आहे. स्पर्शचा ठेका आपण तात्काळ रद्द न केल्यास मला करोनासारख्या महामारीच्या काळामध्ये महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी. यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांना आपण स्वत: जबाबदार रहाल, असा इशारा योगेश बहल यांनी दिला आहे.

WhatsAppShare