अनधिकृत बांधकाम प्रकरणी नगरसेवक पद रद्द

101

पुणे, दि. 4 (पीसीबी): अनधिकृत बांधकाम प्रकरणी काँग्रेस नगरसेवक अविनाश बागवे यांचे नगरसेवकपद मुंबई उच्च न्यायालयानेही रद्द ठरविले आहे. बागवे यांना सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी 6 आठवड्यांची मुदतही न्यायालयाने दिली आहे.

महापालिकेच्या 2017 च्या निवडणूकीत प्रभाग क्र. 19 (अ) लोहियानगर अविनाश बागवे निवडून आले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती असल्याचा दावा त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अ‍ॅड. भुपेंद्र शेडगे यांनी केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्यांची हरकत फेटाळली होती. त्या निर्णयाविरोधात शेडगे यांनी लघुवाद न्यायालयात दावा केला होता. त्यात बागवे यांनी बेकायदा बांधकामाची माहिती लपविली असल्याचे स्पष्ट करीत त्यासंबधीचे पुरावे सादर केले होते. त्यावर न्यायालयाने बागवे यांचे नगरसेवक पद रद्द ठरविले होते. त्याविरोधात बागवे यांनी उच्च न्यायालयात अपिल केले होते. मात्र उच्च न्यायालयानेही बागवे यांचे पद ठरविले आहे.

अविनाश बागवे म्हणाले, उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही आदर करतो. न्यायालयाने पुढील 6 आठवड्यासाठी स्थगिती दिली आहे. तसेच हे नगरसेवकपद जरी फक्त उर्वरित काळासाठी रद्द केले असेल तरी या विरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. आम्हाला विश्वास आहे आम्हाला तिथे न्याय मिळेल.