अधिवेशनासाठी निघालेल्या आमदाराच्या कार अपघाताची २२ दिवसानंतर गुन्ह्यात नोंद

170

पुणे,दि.२८(पीसीबी) – महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन 7 आणि 8 सप्टेंबर रोजी पार पडले. त्या अधिवेशनासाठी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते 6 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता त्यांच्या खेड तालुक्यातील घरून कारने निघाले होते. त्यावेळी त्यांच्या कारला स्पायसर चौक कुरुळी येथे अपघात झाला.

आमदारांची कार कुरुळी येथील स्पायसर चौकात आली आणि सिग्नलवर थांबली. सिग्नल सुटल्यानंतर निघोजे गावाकडे जात असताना समोरून आरोपी नवनाथ नरे याची कार सिग्नल तोडून भरधाव वेगात आली. नवनाथ आणि फिर्यादी यांच्या कारची धडक होणारच एवढ्यात दोन्ही कार चालकांनी ब्रेक लाऊन कार थांबवली.

मात्र, नवनाथच्या कारच्या मागून एक आयशर टेम्पो देखील सिग्नल तोडून आला. टेम्पोने नवनाथच्या स्विफ्ट कारला मागून जोरात धडक दिली. त्यामुळे नवनाथची स्विफ्ट कार आमदार मोहिते यांच्या ऑडी कारवर आदळली. यामध्ये आमदारांच्या ऑडी कारचा बंपर, बंपरची जाळी, गाडीचा लोगो, फोकलॅंप, नंबर प्लेट तुटून 60 हजारांचे नुकसान झाले.

दरम्यान या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना 6 सप्टेंबर रोजी घडली असून याबाबत रविवारी (दि. 27) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsAppShare