अतुल भातखळकर यांनी माहिती घेऊन बोलावे; समाजात तेढ निर्माण करु नये – आमदार सुनिल शेळके

56

तळेगाव दाभाडे, दि. 11 (पीसीबी) – ‘अभिनेत्री कंगना राणावत हिची हुजरेगिरी करणारे भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले आहेत.चार लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार भातखळकर यांनी जबाबदारीने वक्तव्य करायला पाहिजे. कंगनाची हुजरेगिरी करणाऱ्या भातखळकर यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवु नये. न झालेल्या उरुसाची अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही खपवून घेणार नाही,असा इशारा शेळके यांनी वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत भातखळकर यांना दिला. 

लोहगडावर न झालेल्या उरुसाची अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करु नये,’ असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले.अतुल भातखळकर यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी अभ्यासपूर्वक बोलावे. तसेच पुन्हा असे वक्तव्य केल्यास त्यांनी मावळमध्ये येऊन दाखवावे त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार सुनिल शेळके यांनी दिली. 

आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या आरोपानंतर आमदार सुनील शेळके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.जुने व्हिडिओ समाजमाध्यमांवर पसरवून लोहगडावरील उरुस आमदार सुनिल शेळके यांनी आयोजित केल्याचा आरोप काही समाजकंटक करत आहेत. ते चुकीचे असल्याचे शेळके म्हणाले. 

‘राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियम अटींचे पालन आम्ही करत आहोत.अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करु नये. तसेच, प्रसार माध्यमांनी देखील खातरजमा न करता चुकीची बातमी प्रसारित करु नये,’ असे आवाहन आमदार शेळके यांनी यावेळी केले.