अतिताणामुळे कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यास बॉसला दोषी ठरवता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय

41

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – कार्यालयातील कामाच्या अतिताणामुळे जर एखाद्या कर्मचा-याने आत्महत्या केली. तर, त्यासाठी बॉसला दोषी धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक आरोपपत्र दाखल केले होते. हे आरोपपत्र खंडपीठाने फेटाळले.    

महाराष्ट्रातील शिक्षण विभागातील औरंगाबाद कार्यालयात कार्यरत असलेल्या किशोर पराशर यांनी ऑगस्ट २०१७ रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नीने बॉसच्या जाचाला कंटाळून पराशर यांनी आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांत केली होती. पराशर यांच्यावर कामाचा अतिताण होता, त्यामुळे त्यांना संध्याकाळी उशिरापर्यंत कार्यालयातच थांबावे   लागत होते, असेही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले होते.

तसेच वरिष्ठ अधिकारी पराशर यांना सुट्टीच्या दिवशी त्यांना कामावर बोलावून घेत होते.   कामावर आला नाहीस तर तुला पगार देणार नाही, अशी धमकीही बॉस पराशर यांना देत होते.  त्यामुळे घरी आल्यानंतर पराशर हे शांत शांत असायचे, त्यांच्या आत्महत्येसाठी बॉसच जबाबदार आहे, अशी तक्रार पराशर यांच्या पत्नीने केली होती.

पोलिसांनी पराशर यांच्या बॉसविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाने हे एफआयआर फेटाळून लावले होते. त्यानंतर पराशर यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या कर्मचाऱ्याने कामाच्या ताणामुळे आत्महत्या केल्यास त्यासाठी बॉसला गुन्हेगार ठरवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.