अण्णासाहेब मगर बँकेची आर्थिक स्थिती मजबूत, बँकेला बदनाम करण्याचे विरोधकांचे षड्यंत्र – नंदूकुमार लांडे

84

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – अण्णासाहेब मगर सहकारी बँकेच्या कामकाजात अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे खोटे आरोप करून बँकेला बदनाम करण्याचे षड्यंत्र विरोधकांनी रचले आहे. परंतु, बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असून कोणत्याही प्रकारच्या अफवा अथवा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे यांनी शुक्रवारी (दि. ८) पत्रकार परिषदेत केले.

यावेळी नंदकुमार लांडे म्हणाले, “बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब गव्हाणे यांचा मेव्हणा विलास मेमाणे, भाऊ कुशाभाऊ गव्हाणे, मुलगा राहूल गव्हाणे, पुतण्या ऋिषीकेष गव्हाणे व त्यांचा मेव्हणा संदीप शिवले, जावई पोपट कापसे, भाचा विशाल ढोरे व स्वतः बाळासाहेब गव्हाणे अशा एकाच परिवारातील सदस्यांनी चार दिवसांपूर्वी पत्रकार परिषद  घेतली. त्यामध्ये बँकेचे सभासद असलेल्या राहुल गव्हाणे यांनी बँकेच्या कामकाजात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले. प्रत्यक्षात बँकेची आज अखेरची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत आहे. बँकेस कोणत्याही प्रकारची आर्थिक तोशिष लागलेली नाही. राहुल गव्हाणे व माजी पदाधिकाऱ्यांनी केवळ वैयक्तिक आकसापोटी व खोडसाळपणाने बँकेला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचून अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यास सुरूवात केली आहे.

मी स्वतः २०१० मध्ये बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी बँकेच्या ठेवी ६० कोटी ९३ लाख होत्या. मार्च २०१८ अखेर ठेवी २०४ कोटी ६१ लाख झालेल्या आहेत. सभासद कर्जे ३७ कोटी ३३ लाख होते. मार्च २०१८ अखेर कर्जे ११४ कोटी ३६ लाख झालेले आहे. गुंतवणूक २६ कोटींची होती. मार्च २०१८ अखेर ती ८४ कोटी २० लाख आहे. शाखाविस्तार फक्त तीन शाखांचा होता. आज रोजी १० शाखा सुरू आहेत. यावरुन बँकेची आर्थिक प्रगती दिसून येते. बँकेने ज्या वेळी इमारत बांधकामासाठी जागा खरेदी केली. त्याचे भुमीपुजन केले. इमारतीचे नकाशे मंजूर करुन बांधकाम सुरु केले. बांधकाम ठेकेदार मे. आशा असोसिएटस यांची नियुक्ती, आर्किटेक्ट विनोद दाहोत्रे यांची नियुक्ती, बांधकामासंदर्भात केलेल्या अन्य एजन्सीजची नियुक्तीवेळी तसेच फॉर्च्युनर गाडी खरेदीवेळी सभासदांना केलेले कर्जवाटप, कामकाजाच्या सोयीने दिलेल्या पदोन्नतीवेळी आज आरोप करणारे राहुल गव्हाणे यांचे वडील बाळासाहेब गव्हाणे हे बँकेच्या संचालक मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत होते. या सर्व निर्णयामध्ये त्यांचाही सहभाग होता. त्यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारचा विरोध नोंदविला नाही. याचाच अर्थ त्यांची सर्व निर्णयास सहमती होती.

२०१५ मध्ये संचालक मंडळाची निवडणूक झाली. त्यावेळी बाळासाहेब गव्हाणे यांना कायद्यानुसार ही निवडणूक लढविता आली नाही. तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे सर्व उमेदवार पराभूत झाले. दरम्यानच्या काळातील बँकेची प्रगती, शाखा विस्तार व मजबूत आर्थिक स्थिती या सर्व गोष्टी पचनी न पडल्यामुळे व संस्थेतील आपले अस्तित्व संपत आल्याची जाणीव होऊ लागल्याने बाळासाहेब गव्हाणे यांनी स्वतः प्रत्यक्ष सहभाग न घेता आपला मुलगा राहुल गव्हाणे यांच्यामार्फत बँकेच्या विरुध्द तक्रारी करून बँकेला बदनाम करण्याचे सत्र चालू केले आहे. त्याच्या अनुषंगाने बँकेची सहकार खात्याने सहकार कायदा कलम ८१ अंतर्गत सखोल चाचणी लेखापरिक्षण केले असून त्याचा तपासणी अहवाल बँक दप्तरी प्राप्त असून सदर अहवालावर बँकेने दोषदुरुस्ती करून हा अहवाल सहकार खात्यास सादर केला आहे.

या दोषदुरुस्ती अहवालाची पुर्तता झाली आहे किंवा नाही याची तपासणी करणेसाठी कलम ८३ अन्वये चौकशीचे पत्र सहकार आयुक्त यांचे कार्यालयाकडून बँकेस प्राप्त झालेले आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर सत्य परिस्थीती सभासद, ठेवीदार, खातेदार व  हितचिंतक यांचसमोर येईल. त्यामुळे बँकेची सध्याची आर्थिक स्थिती मजबूत असून कोणत्याही प्रकारच्या अफवा अथवा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये. बँकेला जाणूनबूजून बदनाम करण्यासाठी केल्या जाणाऱ्या आरोपांना थारा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.”