अडीच वर्षाच्या मुलीसह तरुणीला नेले पळवून; पोलिसांनी शिर्डीतून ठोकल्या आरोपीला बेड्या

160

शाहूनगर, दि. १४ (पीसीबी) – एका तरुणीला तिच्या अडीच वर्षाच्या चुलत बहिणीसह एका तरुणाने पळवून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी अकरा वाजता शाहूनगर, चिंचवड येथे घडली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला शिर्डीतील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले.

विजय नागोराव राजदेव (वय 22, रा. घोडेगाव गंगापूर, औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 20 वर्षीय पीडित तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 13) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजदेव याने फिर्यादी तरुणीला ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. आपण दोघे पळून जाऊ’ असे म्हटले. त्यासाठी तरुणीने नकार दिला. त्यावरून चिढलेल्या आरोपीने ‘नाही आली तर मी तुझ्या भावाला मारून टाकीन, तुझ्या आई वडिलांची गावात बदनामी करीन आणि तुझ्या लग्नाच्या दिवशी तुझे लग्न मोडून टाकीन’ अशी धमकी दिली.

मंगळवारी सकाळी अकरा वाजता राजदेव याने फिर्यादी आणि त्यांची अडीच वर्षांची चुलत बहीण या दोघींना जबरदस्तीने गाडीत बसून नेले. याबाबत फिर्यादी यांच्या घरच्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला शिर्डी येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण तपास करीत आहेत.