अडीच किलो गांजासह पिंपरीतून एकाला अटक

128

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – विक्रीसाठी आणलेला ३७ हजार रुपये किमतीचा २ किलो ४५० ग्रॅम वजनी गांजा जप्त करुन एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी (दि.२३) रात्री साडेआठच्या सुमारास पिंपरी भाटनगर येथील लिंक रोडजवळ केली.

सतिश करणसिंग ढोले (वय ४०, रा. सर्वे क्र. ५६, वडगाव शेरी, पुणे) असे गांजासह अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेकडील अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती कि, एक तरुण हा पिंपरी भाटनगर येथे गांजा विक्रीसाठी येणार आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी सतिश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळील पिशवीत ३७ हजार रुपये किमतीचा २ किलो ४५० ग्रॅम वजनी गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन सतिशला अटक केली. अमली पदार्थ विरोधीत पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुळे अधिक तपास करत आहेत.