अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन; देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

157

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा (१६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट) राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, वाजपेयींचे विराट व्यक्तिमत्त्व आपल्या कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. अटलबिहारी वाजपेयी एक उत्कृष्ट वक्ते, प्रभावशाली कवी आणि महान पंतप्रधान होते, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आदरांजली वाहिली आहे.

अटलजी आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवायला मन तयार नाही. अटलजी आमच्या हृदयात आहेत. सदैव राहतील, अशी भावूक प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अटल बिहारी वाजपेयी प्रकृती खालावल्यामुळे गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. गुरुवारी संध्याकाळी ५.०५ मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे. शुक्रवारी राजघाटवर संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.