अटलबिहारी वाजपेयींचे निधन १६ ऑगस्टलाच झाले की, त्या दिवशी निधनाची घोषणा केली ? – संजय राऊत

1112

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्टलाच झाले होते की, त्या दिवशी त्यांच्या निधनाची घोषणा केली होती, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अटलजींचा श्वास साधारण १२ आणि १३ ऑगस्टपासून मंदावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्य दिनादिवशी  होणाऱ्या भाषणात अडथळा नको, तसेच   स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको. यामुळे वाजपेयी यांच्या निधनाची घोषणा १६ ऑगस्ट रोजी करण्यात आली  का?  असाही सवालही  राऊत यांनी उपस्थित केला आहे.

राऊत यांनी ‘सामना’त लिहिलेल्या लेखातून वाजपेयींच्या निधनाबाबत शंका उपस्थित केली आहे. १६ ऑगस्टला सांयकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयाने वाजपेयींच्या निधनाची घोषणा केली होती. त्यांनी आपल्या लेखातून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

वाजपेयींची प्रकृती १२ आणि १३ ऑगस्टपासूनच बिघडली होती. मात्र, स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको आणि लाल किल्ल्यावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवायला नको, तसेच पंतप्रधान मोदींचेही लाल किल्ल्यावरून सविस्तर भाषण व्हायचे होते. या राष्ट्रीय विचाराने वाजपेयींनी १६ ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला (किंवा त्यांच्या निधनाची घोषणा केली), असे राऊत यांनी या लेखात म्हटले आहे.