अटकेतील ‘त्या’ पाच जणांचे नक्षलवाद्यांशी संबंध होते – पोलिसांचा गौप्यस्फोट

168

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – देशभरात सुरु असलेल्या नक्षली संबंधाच्या कारवाईवरुन महाराष्ट्र पोलिसांनी मोठ्या गौप्यस्फोट केला आहे. अटकेतील सर्वांचे नक्षलवाद्यांशी संबंध होते. तशी हजारो पत्रं मिळाली आहेत. त्या पत्रांमध्ये नक्षलवाद्यांना मदत, पैसा, हत्यारांचा उल्लेख आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इतकंच नाही तर माओवाद्यांचा सरकारविरोधी युद्ध पुकारुन, सरकार उलथवण्याचा डाव होता, असा दावाही पोलिसांनी केला. लेखक वरवर राव, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वरनॉन गोन्साल्वीस यांच्यावरील कारवाई योग्य असल्याचंही परमवीर सिंह यांनी सांगितले.

या पाचही जणांच्या घरी टाकलेल्या छाप्यात अनेक महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. त्याची न्यायवैद्यक तपासणी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच काही कम्प्यूटर्स, लॅपटॉपचे पासवर्ड मिळवले असून, या सर्व कागदपत्रांवरुन मोठा शस्त्रसाठा विकत घेणं, पंतप्रधान मोदींची हत्या आणि मोदी सरकार उलथवण्याचा कट होता, हे स्पष्ट होत असल्याचंही सिंह यांनी सांगितले.