‘अजेय भारत, अटल भाजपा’; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा

150

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – ‘अजेय भारत, अटल भाजपा’ अशी नवीन घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या शेवटच्या दिवशी केली. ही घोषणा दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित असल्याचेही ते म्हणाले.

२०१९ मध्ये भाजपाचा पुन्हा विजय होईल आणि पुढील ५० वर्षे भाजपाला कोणीच पराभूत करू शकणार नाही, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला. तर कार्यकारिणीच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे सांगितले.

विरोधकांची महाआघाडी ही नेतृत्वहीन, अस्पष्ट नीती आणि भ्रष्ट नियत असलेल्या लोकांची आघाडी आहे. काँग्रेसचे नेतृत्व कोणी स्वीकारण्यास तयार नाही. छोटे-छोटे पक्षही काँग्रेसचे नेतृत्व मान्य करताना दिसत नाहीत. तसेच काँग्रेसच्या पक्षांतर्गत नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित करत आहेत, अशी टीका मोदींनी केली.

काँग्रेस विरोधी पक्षात राहूनही अपयशी ठरली आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष असला पाहिजे. त्यांचे प्रश्न लोकशाही मजबूत करत असतात. पण आमचे दुख: हे आहे की, जे सत्तेत अपयशी ठरले. ते विरोधी पक्ष  म्हणूनही अयशस्वी ठरले आहेत, अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली.