अजित पवार म्हणतात… पार्थ अविवाहीत, लोकसभेत जाऊन बॅचलर लोकांचे प्रश्न सोडवतील

143

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – केवळ अजितदादांचा मुलगा एवढीच ओळख असलेल्या पार्थ पवारच्या विजयासाठी स्वतः अजितदादा जीव तोडून प्रचार करत आहेत. पण हे करत असताना अजितदादा कधी काय बोलतील, याचा नेम राहिलेला नाही. आता तर अजितदादांनी हद्दच केली आहे. पार्थ हा अविवाहीत असून, त्याला निवडून द्या. बॅचलर लोकांचेही काही प्रश्न असतील तर ते पार्थ सोडवेल, असे अजितदादांनी म्हटले आहे.  

आकुर्डीत पार्थ पवार यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी बोलताना अजितदादांनी पार्थ पवारच्या अविवाहीतपणावर मजेत बोलले.

पार्थ पवार अविवाहित आहे. त्याला निवडून द्या. बॅचलर लोकही लोकसभेत गेले पाहिजेत. त्यांचेही काही प्रश्न असतील ते पार्थ पवार सोडतील, असे म्हणत त्यांनी पार्थला निवडून देण्याचे आवाहन केले. उद्घाटन प्रसंगी त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसह मावळचे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावरही टीका केली. ”स्मृती इराणी बारावी पास, हे दहावी पास”, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

मावळमध्ये मुलगा पार्थला जिंकून आणण्यासाठी अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुलासाठी ते सध्या पिंपरी चिंचवडमध्ये तळ ठोकून आहेत. परंतु, राष्ट्रवादीच्या प्रचारात विस्कळितपणा आहे. कोणाचा कोणाला पायपोस नाही. कोण काय काम करतोय हेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कळत नाही. अशा परिस्थितीत जीभ घसरणारे नेते म्हणून कुप्रसिद्ध असलेले अजितदादा कधी काय बोलतील याचा नेम नाही. आता ते पार्थ पवारच्या अविवाहीतपणावर बोलले. अजून दोन आठवडे प्रचार सुरू राहणार आहे. त्यामुळे अजितदादा स्वतःच्या मुलाचा प्रचार करताना पुढे काय काय बोलतात हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.