अजित पवार- देवेंद्र फडणवीस एकाच वेळी कोरोना बाधा झाल्यामुळे रंगली चर्चा

16

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाली असून रुग्णालयात दाखल झाले आहेत. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही करोना झाला असून ते शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर अजित पवार यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबद्दल बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. पवार- फडणवीस यांना कोरोनाची बाधा एकाचवेळी झाल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.

“देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. करोनाची लागण झाल्यावर सरकारी रुग्णालयात दाखल होणार असं त्यांनी आधीच सांगितलं होतं. त्यानुसार त्यांच्यावर सेंट जॉन्स शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. अजित पवारही ब्रीच कँडीतच आहे, त्यामुळे ते एकमेकांशी चर्चा करत असतील, पण करोनामुळे एकमेकांना भेटता येत नसेल’, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस आणि अजित पवारांच्या भेटीसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना एकाचवेळी करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोघांना भेटण्यासाठी करोनाच व्हावा लागतो, असं काही नाही आणि त्यांना भेटायला हॉस्पिटल हे एकच साधन आहे, असंही नाही’.

“मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे. मराठा आरक्षण प्रकरणी ठाकरे सरकार मुळीच गंभीर नाही,” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. “सरकारच्या वकिलांमध्ये समन्वय नाही असं आज दिसून आलं,” असंही ते म्हणाले आहेत. “मराठा आरक्षणाच्या केसचा पुकारा झाला तेव्हा कोणीही हजर नव्हतं. याला काय म्हणायचं? महाराष्ट्र सरकार एवढ्या महत्त्वाच्या प्रश्नी गंभीर नाही हेच दिसून आलं आहे. मराठा आरक्षण सरकारला द्यायचं नाही हेच यातून दिसून येतं आहे. आता चार आठवडे मराठा आरक्षण प्रकरणाला स्थगिती दिली आहे त्यामुळे सगळं काही ठप्प झालं आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे,” असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

WhatsAppShare