अजित पवारांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल – संजय राऊत

175

भोसरी,दि.२६( पीसीबी) – शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकारी मार्गदर्शक मेळावा घेत पाहापालिका निवडणुकीचे बिगूल वाजवले. या वेळी पदाधिकाऱ्यांपुढे आपले विचार मांडताना राऊत यांनी महापालिका निवडणुकीवरुन राष्ट्रवादीला काँग्रेस पक्षाला इशारा दिला आहे. पुण्याचे पालकमंत्री (उपमुख्यमंत्री अजित पवार) आपले नाहीत,राज्यात आपले राज्य असले तरी इथे आपले कुणी ऐकत नाही असे म्हणतात. असे कसे होईल?. असे होता कामा नये. मुख्यमंत्री शिवेसनेचा आहे. अजित पवार मुख्यमंत्र्यांचे ऐकतात. त्यांनी ऐकले तर बरे होईल. नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत आज. (पत्रकारांना उद्देशून) पण थोडे थांबा, चुकीचे लिहू नका. ते दिल्लीचा अंदाज घ्यायला गेलेत. याचे कारण आम्हाला उद्या दिल्लीवर देखील राज्य करायचे आहे. कोण कुठे बसतात हे ते पाहत आहेत. तिथे आपल्याला पोहचायचे आहे. त्याचाच अंदाज घेतायेत. त्यामुळे आपण अजित पवार यांच्याशी बोलू, आपल्याला एकत्र काम करायचं आहे. ते ऐकलं तर ठीक, नाहीतर अवघड होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राऊत यांनी महापालिकेत शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून न आल्याबद्दल खंत व्यक्त केली. हे लक्षात घेत भोसरीत आता शिवसेनेने कामाला सुरुवात करण्याची आवश्यकता आहे, असे सांगतानाच येत्या महापालिका निवडणुकीत आपले असे नगरसेवक निवडून यायला हवेत, असे राऊत यांनी म्हटले आहे. ज्या प्रमाणे राज्यात आहोत, त्या प्रमाणे आपण इथेबी सत्तेतील महत्वाचे वाटकेरी असू. आपली इतकीच माफक अपेक्षा आहे. राज्यात महाविकासआघाडी आहे, मग महापौरपदाची आपण इच्छा व्यक्त केली, तर त्यात आपले काय चुकले, असे सांगतानाच आता आपण संवाद साधू, आले तर सोबत नाहीतर एकटे लढू. आपण सगळ्या उमेदवारांची तयारी करू, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

येथे चार सदस्यीय प्रभागरचना होती, यामुळे आपल्याला फटका बसला. पण भाजप सत्तेत का आली? त्यांना याचा का फायदा झाला, याचाही आपण विचार करायला हवा. मुंबईत जर आपला बोलबाला आहे, तर मग त्या लगतच्या पुणे-पिंपरीत का होत नाही?, ही खंतही त्यांनी बोलून दाखवली. चंद्रकांत पाटील पुण्यात येऊन घासून आले, मग आपण ठासून येऊ. कोल्हापूरचा गडी पुण्यात आला, की कोथरूडमध्ये आला याचा आपल्याला काही फरक पडत नाही, असे सांगतानाच आमच्या अंगावर मात्र येऊ नका, असा इशारा चंद्रकांत पाटील यांना द्यायला राऊत विसरले नाहीत.

WhatsAppShare