अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – संग्राम कोते

264

बीड, दि. १२ (पीसीबी) – राज्याला भाजप-शिवसेनेची बोंडआळी लागली आहे. ती कायमची घालवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून कामाला सुरूवात केली पाहिजे, असे सांगून बुथ कमिट्या सक्षम करा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी केले.

गेवराई व माजलगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात कोते बोलत होते. यावेळी माजी मंत्री प्रकाश सोळंके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित  आदी उपस्थित होते.

यावेळी कोते म्हणाले की, भाजप खोटी आश्‍वासने देवून सत्तेवर आली आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर करण्यासाठी नियोजन पूर्वक काम करण्याची आवश्‍यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार तळागळापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी वन बुथ टेन युथ ही संकल्पना पक्षाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.