अजित पवारांच्या घड्याळ्याचे बारा वाजले, म्हणून राष्ट्रवादीला उमेदवार मिळाले नाहीत – मुख्यमंत्री

427

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवारांच्या घड्याळ्याचे बारा वाजले आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीला भोसरी, चिंचवड मतदारसंघात उमेदवार मिळाला नाही. पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला आहे. त्यांच्यासोबत आता कोणी जायला तयार नाही. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, पण काँग्रेस-राष्ट्रवादीने आधीच पराभव स्वीकारला आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरूवार) येथे केली.  

भाजप –शिवसेना, आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रहाटणीतील कापसे लॉन येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राज्याचे मंत्री बाळा भेगडे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव,  महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी, नगरसेवक, पदाधिकारी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना   निवडणुकीत काँग्रेस हरणार असल्याचे आधीच कळल्याने ते बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांची अवस्था शोले सिनेमातील जेलरसारखी झाली आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ बाकी बचे मेरे पिछे आओ असे  पवार म्हणत आहेत. मात्र,  प्रत्यक्षात त्यांच्यामागे कुणीही नाही,  असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची राज्यात आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत १५ वर्षे सत्ता होती. मात्र त्यांना शहरातील प्रश्न सोडवता आले नाहीत, आज करू, उद्या करू, अशी ते आश्वासन देत होते. परंतु राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर शास्तीकराच्या जुलमातून पिंपरी-चिंचवडकरांची आम्ही सुटका केली. शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याबाबत पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पूर्ण् केला जाईल. त्यासाठी मावळमधील शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. आंद्रा धरणाचे पाणी आणण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. नागरपूर मेट्रोनंतर पुणे, पिंपरी-चिंचवड मध्ये मेट्रोचे काम गतीने सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांची पोलीस आयुक्तालयांची मागणी भाजप सरकारने पूर्ण केली आहे. राज्यातील शहरात घनकचरा प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकारने तीन ते साडेतीन हजार कोटी उपलब्ध करून दिले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

WhatsAppShare