अजित पवारांचा जावईशोध; म्हणे, चले जाव चळवळ महात्मा फुलेंनी सुरू केली

76

नागपूर, दि. १३ (पीसीबी) – संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘चले जाव’ चळवळीसंदर्भात केलेले विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ‘चले जाव’ चळवळ महात्मा फुले यांनी उभी केली, असे विधान अजित पवारांनी केले. महात्मा गांधी यांच्याऐवजी अनवधानाने अजित पवारांनी महात्मा फुले असा उल्लेख केला. मात्र, त्यांची ही चूक सोशल मीडियावरील युजर्सच्या नजरेतून सुटली नाही आणि पवारांचा ‘जावईशोध’ असे म्हणत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ असल्याचे विधान संभाजी भिडे यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात केले होते. या विधानावर तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी नागपूरमध्ये विधिमंडळाबाहेर पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी भाजपा नेत्या आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या विधानाचाही दाखला दिला होता. याबाबत अजित पवार म्हणाले, चले जाव चळवळीमुळे ब्रिटीश भारतातून गेले नाहीत, असे भाजपाचे ज्येष्ठ नेत्या म्हणाल्या. ‘महात्मा फुले’ यांनी चले जावची चळवळ उभी केली. अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि लोकसभा अध्यक्ष असलेल्या सुमित्रा महाजन असे विधान करतात. भाजपाकडून वारंवार असे विधान केले जात आहे. अशाप्रकारची वक्तव्ये करणाऱ्यांच्या मागील बोलवता धनी कोण, हे शोधून काढायला हवे. मनुवादी प्रवृत्ती या देशाला कदापि पुढे घेऊन जाऊ शकत नाही. ही अतिशय चुकीची प्रवृत्ती आहे, असे त्यांनी नमूद केले.

अजित पवार यांनी अनवधानाने महात्मा गांधी यांच्याऐवजी महात्मा फुले यांचा उल्लेख केला. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या नजरेतून ही चूक सुटली नाही. त्यांनी अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल केला. या व्हिडिओबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी संभाजी भिडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘संभाजी भिडे यांना काय बोलावे हेच कळत नाही. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे विचार जगाने मान्य केले. परदेशी लोकंही वारीला येतात. असे असताना संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता, अशा स्वरुपाचे विधान भिडे यांनी केले. मनूने सर्वांना तुच्छ लेखले होते. तो विचार योग्य नाही हे सांगण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. बाबासाहेब आंबेडकरांनीही तो विचार मान्य केला नाही आणि संभाजी भिडे मनुवादी विचार श्रेष्ठ असल्याचे सांगतात. याची कीव करावीशी वाटते, असे त्यांनी नमूद केले.