अजितदादांच्या गौप्यस्फोटानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांचाही धक्कादायक राजकीय गौप्यस्फोट

144

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. आढळराव पाटील हे २००८ मध्ये राष्ट्रवादीत येणार होते आणि त्यासाठी त्यांनी लोणावळ्यात एका हॉटेलमध्ये माझी भेट घेतली होती, असा गौप्यस्फोट अजितदादा पवार यांनी केला. तर या भेटीत अजितदादांनी तुम्ही फक्त राष्ट्रवादीत या. त्या वळसे-पाटलांची पार वाट लावतो. त्यांना चांगलाच धडा शिकवतो, अशी भाषा केल्याचा गौप्यस्फोट आढळराव पाटील यांनी केला आहे.  

हल्लाबोल आंदोलनानिमित्त शिरूर मतदारसंघातील राजगुरूनगर येथे झालेल्या सभेत अजितदादांनी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर सडकून टिका केली होती. आढळराव हे गोडबोले खासदार असून, ते राष्ट्रवादीत येणार होते. त्यासाठी त्यांनी लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये माझी भेट घेतली होती, असा गौप्यस्फोट केला होता.

त्याला आता आढळरावांनी गौप्यस्फोटानेच उत्तर दिले आहे. मी डिसेंबर २००८ मध्ये लोणावळ्यात अजितदादांना भेटलो. या भेटीसाठी अजितदादांनी मला फोन केला होता. आपण कुठे आहात आपल्याला काहीही करून भेटायचेच आहे. कारण पवार साहेबांनी तसे मला सांगितले आहे. त्यामुळे अजितदादांना लोणावळ्यात एका उद्योगपतीच्या बंगल्यावर भेटलो. आम्ही एकत्र जेवण केले आणि जेवताना अजितदादांनी आपल्याला राष्ट्रवादीत येण्याचा आग्रह केला. यावर मी लगेच सांगितले की मी मुळातच दिलीप वळसे पाटलांच्या राजकारणाला कंटाळून केवळ त्यांना विरोध म्हणून शिवसेनेत गेलो आणि खासदार झालो. त्यामुळे मी पुन्हा राष्ट्रवादीत कशाला येऊ अन् संघर्ष करू?, असे म्हणालो.

यावर अजितदादा उफाळून म्हणाले होते की, तुम्ही फक्त राष्ट्रवादीत या. त्या वळसे पाटलांची पार वाट लावतो, त्यांना चांगलाच धडा शिकवायचाय तुम्ही पक्षात याच. अजितदादांची ही भाषा एकूनच यापुढे त्यांच्याशी आणि राष्ट्रवादीशी आता कधीच संवाद ठेवायचा नाही, असे मी ठरविले. परंतु, अजितदादांनी आता लोणावळ्याच्या भेटीबाबत तोंड उघडायलाच लावले आहे, तर त्यांनी आता या बैठकीबाबत आणखीही बोलावे. मी आणखी पोतडी खोलतो आणि त्यांची राजकारणाची स्टाईलही जगजाहीर करतो, असे आव्हान आढळराव पाटील यांनी दिले.