अजानचे भोंगे बंद करा; नमाज घरात पढा, रस्त्यावर नाही – राज ठाकरे

862

पुणे, दि. २७ (पीसीबी) – प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात पाळावा असे सांगत मुस्लीमांनी नमाज घरात पढावा रस्त्यात नाही असे मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडले. पुण्यामध्ये मनसेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना राज ठाकरे संबोधित करत होते. नमाज पढायला रस्ते कशाला हवेत तसेच नमाजासाठीची अजान देण्यासाठी भोंगे कशाला हवेत, असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला. हे भोंगे तुम्ही कुणाला ऐकवता असा सवाल विचारत ते बंद व्हायला हवेत असे ते म्हणाले.

मी मला भेटणाऱ्या मुस्लीमांना सांगतो की सकाळपासून भोंगे कशाला हवेत नमाजासाठी त्यामुळे ते सगळे बंद करा. गुजराती व जैन समाजाचाही उल्लेख राज यांनी केला. मला भेटायला यातली बरीच मंडळी आली होती, परंतु त्यांना मी स्पष्टपणे माझी भूमिका सांगितल्याचे राज म्हणाले. श्रावणामध्ये तसेच पर्युषणामध्ये हे लोक फतवे काढतात की कत्तलखाने बंद करा. कुणी काय खावे काय खाऊ नये हे ज्याचे त्यांनी ठरवावे, असे सांगतानाच आम्ही सांगतो का गटारीला तुम्ही प्यायलीच पाहिजे असा टोला त्यांनी लगावला.

आपापला धर्म घरात ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करताना राज ठाकरे यांनी धर्माचे राजकारण बंद व्हायला हवे, असे त्यांनी सांगितले. राममंदीराचे पण राजकारण करण्यात येत असल्याचा दाखला त्यांनी दिला. आता निवडणुका तोंडावर आल्यावर अमित शाहना राम मंदीर आठवल्याचे सांगत, राम मंदीर गेल्या चार वर्षातच का नाही बांधले, असा सवालही त्यांनी विचारला. राम मंदीराला माझा विरोध नाही परंतु त्याचे राजकारण होता कामा नये, असे सांगत निवडणुकीनंतर राम मंदीर बांधावे असे राज म्हणाले.