अखेर श्रीलंका पंतप्रधान रापक्षे यांचा राजीनामा

269

कोलंबो, दि. ९ (पीसीबी) : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी अखेर पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे. अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या विरोधकांच्या मागणीपुढे झुकत राजपक्षे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीलंकेतील दिवसेंदिवस ढासाळत चाललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे 6 मेच्या मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा आणीबाणी घोषित करण्यात आली होती. देशात गंभीर होत चाललेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंच्या विनंतीनंतर राजपक्षे राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आता राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे. महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर पुढील आठवड्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे वृत्त कोलंबो पेजने दिले होते.

राजधानी कोलंबोमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांदरम्यान महिंदा राजपक्षे यांनी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेत दुसऱ्यांदा आणीबाणी लागू केल्यानंतर देशाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने केली जात असून, सोमवारी राष्ट्रपती भवनाबाहेर धरणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर सरकारी समर्थकांनी हल्ला केला. यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले.