अखेर महापालिकेच्या शाळेतील मुलांना मिळणार गणवेश

158

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – शाळा सुरू होऊन दोन महिने झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर अखेरीस प्रशासनाने वाटप शालेय गणवेश, पि.टी. गणवेश आणि स्वेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरेदीसाठी स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

तसेच महापालिका सभा, विधी समिती आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्‍यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी 28 कोटी 34 लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना मंजुरी दिली. प्रभाग क्र. 4 मधील दिघी येथील स्मशानभूमीला सीमाभिंत बांधणे, बोपखेल येथील महापालिका शाळेच्या वर्गखोल्या बांधणे, पिंपरी वाघेरे येथील 5 लाख लिटर्सची क्षमता असलेली उंच टाकी पाडून नवीन उंच टाकी बांधणे, महापालिकेच्या मंजूर विकास योजनेतील मौजे पुनावळे आणि रावेत येथून जाणाऱ्या मुंबई-बेंगलोर 60 मीटर महामार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या 1200 मीटर सर्व्हिस रस्त्याने बाधित जमिनीचे भूसंपादन करणे आदी विषयांना महापालिका सभेची मान्यता आवश्‍यक होती.

प्रभाग क्र.29 पिंपळे गुरव परिसरात जलनिःसारण नलिका टाकणे व सुधारणा कामे करण्यासाठी 21 लाख, पिंपरी येथील तपोवन रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यासाठी 1 कोटी 11 लाख, नाशिक फाटा ते वाकड रस्ता आणि पदपथांची देखभाल दुरुस्तीसाठी 78 लाख, काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्त्यावरील स्टॉर्म वॉटर चेंबर्सची सफाई करणे, स्थापत्य विषयक दुरुस्तीची कामे करण्यासाठी 1 कोटी 17 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. प्रभाग क्र.9 मधील गोडाऊन इमारत तसेच इतर मिळकतींची दुरुस्तीची स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 34 लाख, प्रभाग क्र.31 मधील नेताजीनगर तसेच उर्वरित भागात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे तसेच एकत्र येणाऱ्या जलनि:सारण व स्ट्रॉम वॉटर लाईन विलगीकरण करण्यासाठी 39 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रभाग क्र. 30 मध्ये एकत्र येणाऱ्या जलनि:सारण व स्ट्रॉम वॉटर लाईन विलगीकरण करणे तसेच कासारवाडी येथील शास्त्रीनगर, वंजारी चाळ, फुगेवाडी येथील फुगे चाळ, वडार वस्ती व इतर परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी 52 लाख रुपये खर्च होणार आहेत.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेकरीता अल्ट्रा हाय डेफिनेशन कॅमेरा सिस्टीम फॉर ऍडवान्स संच खरेदी करण्यासाठी 5 कोटी 52 लाख रुपये खर्च येणार आहे. या खर्चालाही आयुक्त पाटील यांनी मंजुरी दिली आहे. पीएमपीएमएलला 2021- 22 या वर्षातील संचलन तूट रक्कम 16 कोटी रुपये अदा करण्याच्या खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना आयुक्तांनी मान्यता दिली.