अखेर पिंपरीतील जय हिंद शाळा नरमली; ज्युनियर केजीत नापास केलेल्या विद्यार्थ्याला सोमवारपासून शाळेत घेणार

1230

पिंपरी, दि. ८ (पीसीबी)- चक्क जुनियर केजीतील एका विद्यार्थ्याला नापास करून शाळेचा दाखला काढून घेण्यासाठी पालकांवर दबाव टाकण्याचा प्रताप करणारी पिंपरीतील जय हिंद शाळा अखेर नरमली आहे. विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळेसमोरच उपोषणाला सुरूवात केल्याने कोंडी झालेल्या शाळा प्रशासनाने शनिवारी पालकांशी चर्चा केली. नापास केलेल्या विद्यार्थ्याला सोमवारपासून (दि. १०) पुन्हा शाळेत घेण्याचे आश्वासन पालकांना दिले. त्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

पिंपरीत राहणाऱ्या राजेश रोचीरमानी यांचा मुलगा जय हिंद शाळेत जुनियर केजीत शिकत आहे. त्याला या वर्गात नापास करण्याचा प्रताप शाळेने केला होता. तसेच विद्यार्थ्याचा शाळेचा दाखला काढून घेण्यासाठी त्याच्या पालकांवर दबाव वाढवला होता. त्यासाठी शाळा प्रशासन त्या विद्यार्थ्याला शाळेत बसू देत नव्हते. विद्यार्थ्याला नापास केले असले, तरी त्याला पुन्हा त्याच वर्गात बसू देण्याची पालकांची विनंतीही शाळेने धुडकावून लावली होती.

त्यामुळे रोचीरमानी यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यापासून ते पोलिस आयुक्त आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे धाव घेत अन्यायाचे निवेदन दिले होते. परंतु, कोणीच दखल घेत नसल्यामुळे अखेर रोजीरमानी यांनी आपली पत्नी आणि नापास केलेल्या विद्यार्थ्यासह शाळेसमोरच शुक्रवारी (दि. ७) उपोषण सुरू केले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी जाग आलेल्या शाळा प्रशासनाने रोचीरमानी यांच्यासोबत चर्चा केली. विद्यार्थ्याला सोमवारपासून (दि. १०) शाळेत घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. त्यानंतर उपोषण मागे घेतल्याचे रोचीरमानी यांनी सांगितले.